आयुर्वेदामध्ये कडूलिंबाच्या पानाला खूपच महत्त्व देण्यात आले आहे. कडूलिंबाच्या वापराने बरेच आजार बरे होतात. कडूलिंबाची पाने ही चवीला खूपच कडू असतात पण त्यामधील अँटिबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीपॅरासिटीकसारखे गुण आपल्या स्वास्थ्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. या त्याच्या गुणधर्मामुळे कडूलिंबाला अतिशय खास असे एक स्थान आहे. आपल्याकडे भारतामध्ये कडूलिंबाची ओळख ही एक ‘गावठी औषध’ म्हणून आहे ते यामधील गुणधर्म आणि सहज उपलब्धता यामुळे. कडूलिंबाचे झाड हे एक असे झाड आहे, ज्याचा प्रत्येक भाग आपल्यासाठी कोणत्या ना कोणत्या आजारावर गुणकारी आहे.
भारतीय वेदांमध्ये कडूलिंबाचं नाव हे सर्व प्रकारच्या आजारांवरील औषध म्हणून घेतले गेले आहे. “रोग निवारण औषधी” म्हणजेच सर्व प्रकारच्या आजारांना रोखणारी वनस्पती ही कडूलिंबाची ओळख आहे. कडूलिंब हे दोन प्रकारचे असतात. त्यापैकी एक गोड कडूलिंब आणि एक कडू कडूलिंब असतो. दोन्हीमध्ये औषधीय गुण आहेतच. पण गोड कडूलिंबापेक्षा जास्त उत्तम व औषधी आहे कडू कडूलिंब. आधुनिक शोधाप्रमाणे सिद्ध झालं आहे की, कडूलिंबामध्ये असणाऱ्या औषधीय गुणांचा हात कोणीच धरू शकत नाही.
आपल्याकडे घराजवळ कडूलिंबाचं झाडं असणं हे शुभ मानले गेले आहे. तसेच कडूलिंब आसपासची हवा शुद्ध ठेवतो. आज आपण इथे कडूलिंबाच्या पानांचा नक्की काय फायदा होतो ते पाहणार आहोत. आपल्या आरोग्यासह आपल्या सौंदर्यासाठीही कडूलिंबाच्या पानाचा उपयोग केला जातो.
पिंपल्स म्हणजेच चेहर्यावरील मुरूमे घालवतात- त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि त्वचेवरील मुरूमे घालवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. वास्तविक कडूलिंबामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग जाण्यासाठी मदत होते. त्वचेचं रक्षण करण्यास याची मदत होते.
केसांसाठी कडूलिंब- कडूलिंब हे केसांसाठी खूपच फायदेशीर वनस्पती आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व असतात, जे आपल्या केसांची खूप काळजी घेतात आणि केसांना योग्य प्रकारे पोषण देतात. याचबरोबर यामुळे केसांच्या समस्यांमधूनही सुटका मिळते. केस मुलायम व तजेलदार दिसतात. केसांची गळती थांबते. केसांमधील उवा व कोंड्याची समस्या दूर होते. कडूलिंबाची पाने उकळून घ्या आणि ते पाणी केस धुवायला वापरा. त्याचबरोबर, कडिलिंबाची पाने उकळून त्यामध्ये मध मिसळा आणि त्याची जाड पेस्ट तयार करा आणि ती कोंड्यावर लावा. त्यामुळे ही समस्या मूळापासून निघून जाईल. यामुळे तुमच्या केसांची चमक वाढेल आणि केस मुलायमदेखील बनतील.
त्वचेसाठी कडूलिंब -आरोग्यासह सौंदर्यासाठी कडूलिंबाचा पाला हा रामबाण उपाय आहे. वास्तविक कडूलिंबाच्या पानांमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे तुमच्या त्वचेची काळजी करतात त्याचबरोबर तुमचे त्वचेच्या आजारांपासून संरक्षण करतात. बाजारामध्ये मिळणाऱ्या सर्व सौंदर्य प्रसाधनांमध्ये कडूलिंबाच्या पानांची पेस्ट नक्कीच मिसळली जाते. प्रत्येकालाच वाटत असते की, आपल्याला म्हातारपण लवकर येऊ नये. पण आजकालच्या जीवनशैलीमुळे वेळेआधीच चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात. पण तुम्हाला माहीत आहे का? कडूलिंबाच्या पानांमध्ये एजिंग समस्येवर तोडगा आहे. हे यावरही एक चांगलं औषध आहे. कडूलिंबाची पानं ही तुमचे वय वाढवण्याची प्रक्रिया कमी करते आणि त्यामुळे तुमची त्वचा ही तुकतुकीत व टवटवीत राखण्याचे काम कडूलिंबाची पाने करतात.